
सरकारचा सकारात्मक विचार; अभ्यास समिती लवकरच
महाराष्ट्रातील दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी भागांतील एस.टी. प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी मिळू शकते. या भागांतील नागरिकांना एस.टी. तिकिटात सवलत देण्याचा विचार सध्या सरकार करत आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने अभ्यास समिती स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत.
🔸 ठळक मुद्दे:
- दुर्गम भागांतील प्रवाशांसाठी ५०% सवलतीची मागणी
- आदिवासी व गरजू प्रवाशांसाठी विशेष योजना तयार होण्याची शक्यता
- सध्याच्या सवलतींपेक्षा अधिक व्यापक सवलतींचा विचार
- परिवहन मंत्र्यांकडून सकारात्मक संकेत
प्रवाशांची स्थिती:
गडचिरोली, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पालघर अशा दुर्गम जिल्ह्यांतून नागरिक दररोज एस.टी.ने प्रवास करतात. मात्र तिकीट दर वाढल्यामुळे आर्थिक ओझं वाढलं आहे. स्थानिक आमदार, सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्था याबाबत जोरदार आवाज उठवत आहेत.
परिवहन मंत्र्यांनी सांगितले,
“एस.टी. महामंडळ आर्थिक अडचणीत असले तरी दुर्गम भागांतील जनतेची अडचण समजून घेत आहोत. सवलतीचा प्रस्ताव अभ्यास समितीकडे आहे. लवकरच निर्णय घेतला जाईल.“
सध्या कोणाला किती सवलत?
- ज्येष्ठ नागरिक:६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या साध्या आणि निमआराम (semi-luxury) बसमध्ये ५०% सवलत मिळते. ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास करण्याची सुविधा आहे.
- महिला:राज्यभरातील सर्व महिला प्रवाशांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये तिकीट दरात ५०% सवलत मिळते.
- विद्यार्थी:शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात काही विशिष्ट सवलती मिळतात.
- दिव्यांग (अपंग):दिव्यांग व्यक्तींसाठी विविध सवलती आहेत, जसे की, प्रवास भाड्यात सवलत किंवा मोफत प्रवास.
- स्वातंत्र्यसैनिक:स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्यासोबतच्या एका जोडीदाराला एसटीच्या साध्या आणि निमआराम बसमध्ये वर्षभर मोफत प्रवास करण्याची सुविधा आहे.
- तसेच :डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्यांच्यासोबतच्या एका जोडीदारालाही एसटीच्या साध्या आणि निमआराम बसमध्ये वर्षभर मोफत प्रवासाची सवलत आहे
अशाच सुविधांच्या अनुषंगाने दूरच्या प्रवासात सवलत देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून अधिकृत घोषणा जुलैच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे असे सूत्रांकडून कळते.