
पुणे रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याच्या प्रस्तावावरून राजकीय वाद उफाळून आला आहे. भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ असे ठेवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला विविध पक्ष आणि संघटनांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
मेधा कुलकर्णी यांच्या मते , ” थोरल्या बाजीराव पेशव्यांनी शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील स्वराज्याचा विस्तार अटक पर्यंत केला , तत्कालीन स्वराज्याचे केंद्र असलेल्या शनिवार वाड्यातून म्हणजेच पुण्यातून सर्व कारभार केला जात असे त्यांची आठवण म्हणून पुणे स्थानकाला त्यांचे नाव योग्य आहे “
या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी म्हटले की, “महात्मा ज्योतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, धर्मवीर संभाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांची नावे देखील विचारात घेतली पाहिजेत.”
संभाजी ब्रिगेडने ‘महात्मा ज्योतिराव फुले’ यांचे नाव सुचवले आहे. यामुळे विविध गटांकडून विविध नावे सुचवली जात आहेत.
पुणे शहराची स्थापना आणि त्याची मुहूर्तमेढ उभी करण्याचे काम राजमाता जिजाऊनी केले आहे , त्यामुळे त्यांचे नाव पुणे स्थानकाला देण्यात यावे अशी भूमिका इतिहास संशोधक कोकाटेंनी घेतली आहे.
रेल्वे मंत्रालयाने या प्रकरणावर अद्याप तरी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, या वादाच्या अनुषंगाने पुणे रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामांमध्ये इतिहासाचा समावेश कसा केला जाऊ शकतो यावर चर्चा सुरू आहे.